
10 ऑक्टोंबर 2026 l शनिवार
Talk18 मराठी l आण्णा भोसले :
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी, एएनएम आणि आरोग्य सेवकांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे माळशिरस मंडलध्यक्ष शाहिद शेख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद, सोलापूरचे आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांना ९ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखी निवेदन सादर केले.
निवेदनातील प्रमुख मागणी
चांदापुरी गावाची लोकसंख्या अंदाजे तीन हजार असून, गावातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप या उपकेंद्रात आवश्यक वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे इमारत पूर्ण होऊनही ग्रामस्थांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याचा मुद्दा शेख यांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांना इतर गावांत जावे लागते
उपकेंद्रात कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे गावातील नागरिकांना, विशेषतः गावातील ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ उपचारांसाठीही पिलीव, अकलूज किंवा माळशिरस येथे जावे लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे ग्रामस्थांना अनावश्यक प्रवास करावा लागत असून, गावातच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग या मागणीवर किती लवकर कार्यवाही करणार , याकडे चांदापुरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


