Uncategorized

शेती, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम – “अकलूज फेस्टिव्हल”

आण्णा भोसले / अकलूज
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने आयोजित ‘अकलूज फेस्टिव्हल व कृषी प्रदर्शन’ गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत अकलूज येथे आयोजित करण्यात आले आहे. धवलश्रीराम मंदिर, धनश्रीनगर, इंदापूर रोड, अकलूज येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे भव्य आयोजन होणार आहे.

अकलूजचे ग्रामदैवत आई अकलादेवी यांच्या आशीर्वादाने तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रेरणेतून या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये कृषी प्रदर्शन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया व माहितीपर स्टॉल्स, शेतकरी-शेतीसंलग्न कंपन्यांचे प्रदर्शन, तसेच खरेदीसाठी विविध वस्तूंचे स्टॉल्स उपलब्ध असतील. यासोबतच महिलांसाठी विशेष पैठणी कार्यक्रम, फनफेअर, ब्रेक डान्स, सलोखो, नावडी, टोराटोरा, टॉवर, ड्रॅगन ट्रेन, मिकी माऊस, जम्पिंग बाऊन्सर बोट, फॅशनेबल कपडे, गृहउपयोगी वस्तू आदी आकर्षणे असणार आहेत.

दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी शाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहीर लोकगाथा कार्यक्रम होणार आहे. महिलांसाठी विशेष पैठणी कार्यक्रम, पारंपरिक लावणी, राष्ट्रपती पारितोषिक विजेते मंगला बनसोडे व नितीन बनसोडे यांचा लोकनाट्य-तमाशा, तसेच चांडाळ चौकडीचा धमाल विनोदी कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. समारोपाच्या दिवशी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या सहऑर्केस्ट्रा आंतरराष्ट्रीय दर्जाची आतिषबाजी इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या बहुविध कार्यक्रमांमुळे अकलूज फेस्टिव्हल व कृषी प्रदर्शन नागरिकांसाठी ज्ञानवर्धक व मनोरंजनात्मक ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ.धवलसिंह मोहिते पाटील वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button