
दिनांक : २४ सप्टेंबर वार : गुरुवार
Talk18 मराठी l पिलीव प्रतिनिधी :
सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवर सद्गुरु श्री श्री रविशंकरजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सद्गुरु श्री श्री सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर २०२६-२७ या गळीत हंगामाचा शुभारंभ धार्मिक व भक्तिमय वातावरणात करण्यात आला. सत्यनारायण महापूजा, सुदर्शन होम, बॉयलर अग्निप्रदीपन, ऊस वाहतूक वाहन पूजन, बैलगाडी व मोळी पूजन तसेच गव्हाण पूजन अशा विविध धार्मिक विधींनी कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कारखान्याच्या वजन काट्यावर व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व सौ. शोभा बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यानंतर चेअरमन एन. शेषगिरीराव यांच्या हस्ते सुदर्शन होमपूजा करण्यात आली. पुणे येथील कापरे गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात धार्मिक विधी पार पडले.
यानंतर चेअरमन एन. शेषगिरीराव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालक श्रावण (दादा) वाकसे, मोहन आप्पा बागल, वेदांत जाधव, जनरल मॅनेजर सत्यनारायण रेड्डी तसेच सर्व खातेप्रमुख यांच्या हस्ते कारखान्याच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले.
गळीत हंगामाच्या पारंपरिक शुभारंभानिमित्त ऊस भरून आलेल्या वाहनाचे पूजन ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर, मळवली यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बैलगाडी पूजन, मोळी पूजन व गव्हाण पूजनानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकण्याचा कार्यक्रम पार पडला.
१२ हजार हेक्टर क्षेत्राची नोंद
कार्यक्रमाच्या सभेत केन मॅनेजर सुनील सावंत यांनी प्रास्ताविक करताना चालू गळीत हंगामासाठी कारखान्याची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. यंदाच्या हंगामासाठी ६०० ट्रॅक्टर आणि १० हार्वेस्टर मशीनचे करार करण्यात आले असून, एकूण १२ हजार ९० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी चेअरमन एन. शेषगिरीराव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व संचालक श्रावण (दादा) वाकसे यांनी मार्गदर्शन करताना गेल्या १४ वर्षांपासून सभासद शेतकरी, ऊस उत्पादक व हितचिंतकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. भविष्यातही हेच सहकार्य कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘शेतकऱ्यांचे हित हेच आमचे हित’ हे धोरण केंद्रस्थानी ठेवून कारखान्याचे संचालक मंडळ काम करत असून, आगामी काळातही शेतकरीहिताला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनेचे कांतीलाल नाईकनवरे, राजेवाडीचे सरपंच प्रशांत शिरकांडे, चांदापुरीचे माजी सरपंच भजनदास चोरमले यांनी आपले विचार मांडले. ह. भ. प. बापूसाहेब देहूकर महाराज यांनीही मार्गदर्शन करत कारखान्याच्या वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिले.कार्यक्रमास हिंगणीच्या सरपंच संगीताताई सरतापे, संग्राम दुपडे, शाम तात्या मदने, ज्योतीराम अवताडे, चांदापुरीचे माजी सरपंच भजनदास चोरमले, नईम खान पठाण यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार तसेच मोठ्या संख्येने ऊस उत्पादक सभासद शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ देवकर यांनी केले, तर आभार शेती अधिकारी दत्ता क्षीरसागर यांनी मानले.


