
📍Talk18 मराठी | दिनांक : 12 जुलै 2026 | रविवार
चौंडेश्वरवाडी (ता. माळशिरस) येथील उषा विजय साठे यांच्या खूनप्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी माळखांबी येथे सकल बहुजन समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. पीडित महिलेचे पती विजय साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला.
मोर्चाची सुरुवात उषा साठे यांच्या घरापासून झाली. गावातील प्रमुख मार्गांवरून ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
मोर्चेकऱ्यांनी खूनप्रकरणात वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचा परवाना ज्यांच्या नावावर आहे, त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी केली. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
मोर्चामध्ये माळशिरस तालुक्यातील सकल बहुजन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विविध बहुजन संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
निवेदन विजय सुदाम साठे, विलास सुदाम साठे, बबन सुदाम साठे, आरती विजय पाटोळे, जिजाबाई जालिंदर खंडागळे, लता पाटोळे, छाया बबन साठे, गोपीनाथ सुदाम साठे, अश्विनी परशू हेगडे आणि विशाल बबन साठे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. साळुंखे यांच्याकडे सादर केले.
मोर्चादरम्यान तपास अधिकाऱ्यांशी थेट संवाद….
सभेदरम्यान किरण साठे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून निवेदनावर झालेल्या कारवाईची माहिती विचारली. त्यावेळी श्री. वाळके यांनी पिस्तुलाचा परवाना ज्यांच्या नावावर आहे त्या जगन्नाथ देशमुख यांना आरोपी करण्यात आल्याची माहिती स्पीकरवरून दिल्याचा दावा करण्यात आला.
या घोषणेनंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. तसेच निवेदनातील मागण्यांवर पुढील लेखी कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने पीडित कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.


