Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

बिरादार फ्रुट्स मशरूम शेती प्रकल्पास आमदार उत्तमराव जानकर यांची भेट; आधुनिक शेती तंत्रज्ञानाची घेतली माहिती

सोलापूर | रविवार, दि. १२ जुलै २०२६ | प्रतिनिधी

सोलापूर एमआयडीसी परिसरातील बिरादार फ्रुट्स मशरूम शेती प्रकल्पास माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सदिच्छा भेट देत प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी मशरूम उत्पादनाची आधुनिक पद्धत, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण तसेच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगार व उत्पन्नाच्या संधींची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

यावेळी प्रकल्पाचे प्रोडक्शन मॅनेजर गोपाल भाकरे यांनी मशरूम शेतीचे महत्त्व, कंपोस्ट तयार करण्यापासून ते उत्पादन, पॅकिंग, साठवणूक आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आमदार जानकर यांना समजावून सांगितली. तसेच कमी जागेत, कमी पाण्यात आणि नियंत्रित वातावरणात अधिक उत्पादन घेता येत असल्याने मशरूम शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि रोजगाराभिमुख व्यवसाय ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार उत्तमराव जानकर यांनी प्रकल्पातील विविध विभागांची पाहणी करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या उत्पादन व्यवस्थेचे कौतुक केले. शेतीमध्ये पारंपरिक पिकांसोबतच मूल्यवर्धित व आधुनिक शेती व्यवसायांचा स्वीकार करणे ही काळाची गरज असून, मशरूम शेतीसारखे उद्योग ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकल्पांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button