
Talk18 मराठी अकलूज प्रतिनिधी l ३ जुलै २०२६
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयवाडी येथे मे २०२६ मध्ये घडलेल्या अत्यंत धाडसी आणि सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात अकलूज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला (DB Team) मोठे यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत शिताफीने ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून ₹१२ लाख ४६ हजार ५४६ रुपये किमतीचे ८४.७६ ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, आणखी ४ सराईत गुन्हेगारांची नावे निष्पन्न झाली आहेत.
६८ वर्षीय वृद्धाच्या छातीला गलोल लावून टाकला होता दरोडा
१७ मे २०२६ रोजी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास विजयवाडी (ता. माळशिरस) येथील रहिवासी प्रदिपसिंह शंकरराव कदम (वय ६८) यांच्या घरात चार अनोळखी शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश केला. आरोपींनी कदम यांच्या छातीला गलोल लावून त्यांच्या पत्नी व सासू यांना मारहाण करण्याची भीती दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०९(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘रेकी’ करून वृद्ध दांपत्याला केले होते लक्ष्य
सखोल तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. स्थानिक गुन्हेगार प्रकाश कैलास भगवे याच्या मदतीने दरोडेखोरांनी घराची पूर्वरेकी केली होती. घरात केवळ वृद्ध दांपत्य आणि वयोवृद्ध सासू राहत असल्याची माहिती टोळीला देण्यात आली होती. रात्री प्रतिकार होणार नाही, याची खात्री करूनच हा दरोडा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने टाकण्यात आला.
हॉटेलमध्ये ‘वेटर’ बनून आरोपीला ठोकल्या बेड्या,गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर डंप डेटा आणि सायबर विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. मुख्य आरोपी पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होता. तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. अकलूजचे पोलीस चक्क वेटरच्या वेषात हॉटेलमध्ये थांबले आणि आरोपी हॉटेलमध्ये दाखल होताच त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली.
पुरावा नष्ट करण्यासाठी दागिने वितळवून तयार केले सोन्याचे शिक्केआरोपींच्या चौकशीतून धाराशिवमधील सोनार निलेश महादेव चव्हाण याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्यालाही अटक केली. दरोड्यातील दागिने वितळवून त्याचे सोन्याचे शिक्के तयार करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी त्याच्याकडून ८४.७६ ग्रॅम वितळवलेले सोने हस्तगत केले.
अटक आरोपीआशिष बप्पा काळे (रा. डिकसळ, ता. कळंब, जि. धाराशिव) – मुख्य दरोडेखोरप्रकाश कैलास भगवे (रा. विजयवाडी, ता. माळशिरस) – रेकी करणारा स्थानिक म्होरक्यानिलेश महादेव चव्हाण (रा. कळंब, जि. धाराशिव) – चोरीचे सोने घेणारा सोनारया गुन्ह्यातील आणखी ४ सराईत दरोडेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
या जांबाज पथकाने बजावली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सपोनि विक्रम साळुंखे, गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोहेकॉ सुहास क्षिरसागर, विक्रम घाडगे, शिवकुमार मदभावी, विनोद साठे, दत्ता खरात, सोमनाथ माने, पंडित गवळे, तुकाराम माने देशमुख आणि सायबर शाखेचे प्रवीण मेटकरी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
अकलूज पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे आणि चाणाक्ष तपासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, नागरिकांकडून पोलीस पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


