Uncategorizedअकलूजमहाराष्ट्रविशेषसामाजिक

शिवसेनेच्या माढा लोकसभा युवा सेना संपर्क प्रमुखपदी सुजित खुर्द यांची निवड

Talk18 मराठी | आण्णा भोसले

माढा (प्रतिनिधी) : शिवसेना संलग्न युवासेनेने माढा लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, सुजित दत्तात्रय खुर्द यांची ‘युवासेना माढा लोकसभा संपर्क प्रमुख’पदी नियुक्ती केली आहे. आगामी सदस्य नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शन तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या शिफारशीमुळे खुर्द यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नूतन संपर्क प्रमुख म्हणून सुजित खुर्द यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघातील S.I.R. प्रक्रिया राबवणे, संघटन मजबुतीकरण करणे आणि मतदार यादी अद्ययावत ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच तळागाळातील युवकांना एकत्रित करून व्यापक सदस्य नोंदणी अभियान राबवण्यावर त्यांचा विशेष भर राहणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून युवासेनेत सक्रिय असलेल्या खुर्द यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तसेच कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सुजित खुर्द म्हणाले,
“पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर दाखवलेला विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेन. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात युवासेनेचे विचार पोहोचवून युवकांना संघटित करणे आणि मतदार नोंदणी प्रक्रिया पारदर्शकपणे राबवणे, हेच माझे प्रमुख ध्येय राहील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button