Uncategorized

माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर, भाजपामध्ये अंतर्गत बंडाचे सावट

Talk18मराठी l आण्णा भोसले :

माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद गटाच्या ९ जागा आणि पंचायत समितीच्या १८ गणांसाठी होणाऱ्या निवडणुकांचे बिगुल वाजताच तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तासमीकरणे वेगाने बदलत असून, आगामी निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


२०१७ साली एकमेकांच्या विरोधात उभे असलेले मोहिते पाटील समर्थक आणि विरोधक आज एकत्र येत नवे राजकीय समीकरण आकारास आले आहे. या अनपेक्षित एकजुटीचा सर्वात मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसताना दिसत असून, भाजपसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.


लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपकडून तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत थेट राजकीय भूमिका बदलली. त्याच काळात मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्यातील दीर्घकालीन वैचारिक मतभेद संपुष्टात आले आणि दोन्ही नेते एकत्र येत भाजपला जोरदार धक्का दिला.


या एकजुटीच्या बळावर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळत मोहिते पाटील यांनी आमदार उत्तमराव जानकर यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. परिणामी भाजपचे तत्कालीन आमदार रामभाऊ सातपुते यांचा दारुण पराभव झाला.


या पराभवानंतर रामभाऊ सातपुते यांनी मोहिते पाटील–जानकर गटाच्या विरोधात स्वतंत्र राजकीय गट उभा करण्याचा प्रयत्न केला. मात्र या रस्सीखेच राजकारणात भाजपलाच सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आणि मोहिते पाटील–जानकर गटाने माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपली राजकीय ताकद अधोरेखित केली.


आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपसमोर केवळ बाह्य विरोधकांचेच नव्हे, तर पक्षातील अंतर्गत राजकारणाचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. माळशिरस तालुक्यात भाजपची पायाभरणी करणारे, मोहिते पाटलांच्या विरोधात ठाम भूमिका घेत पक्ष वाढवणारे जुने, अनुभवी आणि भूमिपुत्र नेते आज दुर्लक्षित असल्याची तीव्र भावना पक्षांतर्गत पसरली आहे.


माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्यावर एकाधिकारशाही वृत्तीचा आरोप होत असून, जुने नेते डावलून केवळ स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहे. संजीवनी पाटील, के. के. अप्पासाहेब देशमुख, बाळासाहेब वावरे, सोपान काका नारनवर, बाळासाहेब सरगर यांच्यासारख्या नेत्यांनी संघर्षातून भाजप उभी केली; मात्र आज त्यांनाच दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.


जर या जुन्या व अनुभवी नेत्यांनी स्वतंत्र भूमिका घेत तिसरी आघाडी उभारली, तर भाजपसाठी ही स्थिती अत्यंत अडचणीची ठरू शकते. अशा परिस्थितीत मोहिते पाटील गट आणि जानकर गट या दोघांनाही एकाचवेळी शह देणे भाजपसाठी जवळपास अशक्य होईल, असा सूर राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे.


एकंदरीत, माळशिरस तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजपसाठी केवळ बाह्य संघर्षाची नव्हे, तर अंतर्गत नाराजी, दुर्लक्ष आणि नेतृत्वातील मतभेदांची खरी कसोटी ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button