अकलूज नगरपरिषद मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

निकाल दुपारी १२:३० पर्यंत जाहीर होण्याची शक्यता
आण्णा भोसले / अकलूज :अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, मंगळवार दि. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याबाबत शहरात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी, संगणक संचालन तसेच ईव्हीएम हाताळणीसाठी एकूण २५ टेबल्सवर ४६ कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता अकलूज येथील नगरपरिषद क्रीडा संकुलात सुरू होणार असून, संपूर्ण निकाल प्रक्रिया साधारण अडीच ते तीन तासांत पूर्ण होईल. दुपारी १२:३० वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.अकलूज नगरपरिषदेत एकूण १३ प्रभाग असून, प्रथम प्रभाग क्रमांक १ ते ७ यांची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक ८ ते १३ या प्रभागांची मतमोजणी करण्यात येईल. याच वेळी नगराध्यक्ष पदाचीही मतमोजणी केली जाणार आहे.या निवडणुकीत १३ नगरसेवक पदांसाठी तर १ नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात आहेत. शहरातील एकूण ३४,४०८ मतदारांपैकी पुरुष १२,८६२, महिला १२,६५० तर इतर ६ मतदारांचा समावेश असून, एकूण २३,८१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.मतमोजणीसाठी ७ टेबल्स ठेवण्यात आले असून, प्रत्येक टेबलवर ३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, निकालानंतर राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.


