
दिनांक : १८ सप्टेंबर २०२६ | वार : शुक्रवार
Talk18 मराठी श्रीपूर (प्रतिनिधी) : आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत कर्मयोगी सुधाकर बंधू परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूर येथे हंगामपूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी कारखान्याच्या विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

पाहणीदरम्यान यंत्रसामुग्रीची दुरुस्ती, देखभाल, गळीत हंगामासाठी आवश्यक तांत्रिक तयारी, ऊस वाहतूक व्यवस्था तसेच उत्पादन प्रक्रियेशी संबंधित विविध विभागांतील कामांची माहिती घेण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागप्रमुख व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रशांतराव परिचारक यांनी प्रत्येक विभागप्रमुखाशी चर्चा करून उर्वरित सर्व कामे वेळेत, दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी शेतकरी सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि ऊस वाहतूकदार यांच्या सहकार्याने आगामी गळीत हंगाम यशस्वी, सुरळीत आणि विक्रमी करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कारखाना प्रशासन नव्या ऊर्जेने आणि पूर्ण तयारीसह हंगामाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले.


