
गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६
Talk18 मराठी l आण्णा भोसले : चांदापुरी तालुका माळशिरस येथे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होण्याबरोबरच त्यांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव व्हावी आणि बदलत्या काळातील कायदेशीर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम नागरिक घडावेत, या उद्देशाने विधी सेवा फाऊंडेशनच्या वतीने सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, चांदापुरी येथे मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, पोक्सो कायदा, विद्यार्थ्यांचे कायदेशीर हक्क व जबाबदाऱ्या, सायबर सुरक्षा, महिला व बालकांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे तसेच दैनंदिन जीवनातील कायद्याचा उपयोग याबाबत सोप्या व संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.
‘अडचण निर्माण झाल्यानंतर कायदा शोधण्यापेक्षा, अडचण येण्यापूर्वी कायदा समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे,’ या भूमिकेतून विविध कायदेशीर बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न उपस्थित केले. उपस्थित विधिज्ञांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कायदेशीर दृष्टिकोनातून उत्तरे देत मार्गदर्शन केले.
‘कायदा प्रत्येकासाठी, न्याय सर्वांसाठी’ या संकल्पनेतून विधी सेवा फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कायदेविषयक जनजागृती अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी विधी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. धनंजय बाबर, उपाध्यक्ष ॲड. भारत गोरवे, सचिव ॲड. सुमित सावंत, खजिनदार ॲड. वैशाली कांबळे, सहसचिव ॲड. गोपाळ लावंड, संस्थापक सदस्य ॲड. अभिषेक चंदनशिवे व ॲड. सुप्रिया पोळ उपस्थित होते.
कार्यशाळेच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांनी विधी सेवा फाऊंडेशनचे आभार मानले.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


