
8 ऑक्टोंबर 2026 गुरुवार
Talk18 मराठी माळशिरस प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतात पिके उभी राहत नाहीत, पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे. या परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब उर्फ आप्पासाहेब मगर यांनी केली आहे.
माळशिरस तालुक्यात अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतीची अवस्था बिकट झाली आहे. पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित पाऊस न मिळाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके करपून गेली आहेत, तर काही भागात शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च सहन करावा लागला आहे.
शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या घरातील खर्चाचा गाडा चालवणे कठीण झाले आहे. त्यातच शेतमजुरांच्या हाताला शेतीची कामे कमी मिळत असल्याने त्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पशुधन हा शेतकऱ्याच्या संसाराचा मोठा आधार आहे. मात्र पाऊस नसल्याने चारा मिळणे कठीण झाले असून बाजारात चाऱ्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे जनावरांना चारा घालायचा तरी कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. जनावरांसाठी पाणी आणि चारा उपलब्ध करून देणे आता गरजेचे झाले आहे.
या परिस्थितीत प्रशासनाने गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या शेताची आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी बाळासाहेब उर्फ आप्पासाहेब मगर यांनी केली आहे.
तसेच ज्या गावांमध्ये चाऱ्याची मोठी अडचण आहे, त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा चारा डेपो उपलब्ध करून द्यावेत. जनावरांना पिण्याचे पाणी मिळेल याचीही व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
“शेतकरी अडचणीत आहे. त्याच्या शेतात पीक नाही आणि जनावरांना चारा नाही. अशा वेळी प्रशासनाने फक्त कागदावर निर्णय घेऊन चालणार नाही. अधिकारी आणि प्रशासनाने गावात जाऊन शेतकऱ्यांची अडचण समजून घ्यावी आणि त्याला धीर द्यावा,” असे बाळासाहेब नेते उर्फ आप्पासाहेब मगर यांनी Talk18 मराठीशी बोलताना सांगितले.
माळशिरस तालुक्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्यापूर्वी पंचनामे, पाणी, चारा आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदत याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी मगर यांनी केली आहे.


