आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नाला यश माळशिरस तालुक्याला औद्योगिक विकासाची नवी दिशा

Talk18 मराठी l आण्णा भोसले
माळशिरस प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच तालुक्यात औद्योगिकीकरणाला चालना मिळावी या उद्देशाने शिवपुरी मळा व श्रीपूर मळा येथे नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) वतीने संबंधित क्षेत्राचा प्राथमिक सर्वे करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय सोलापूर यांनी तहसीलदार माळशिरस यांना अधिकृत पत्र पाठवून प्रस्तावित जमिनींची माहिती मागविली आहे. या पत्रामध्ये श्रीपूर मळा परिसरातील महाळुंग, बोरगाव, जांबूड तसेच शिवपुरी मळा परिसरातील गुरसाळे व दहिगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक क्षेत्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. उत्तमराव जानकर यांनी उद्योगमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून तालुक्यात MIDC स्थापन करण्याची मागणी लावून धरली होती. तसेच माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज यांनीही या प्रस्तावास पाठिंबा देत संबंधित ठिकाणांची स्थळ पाहणी करण्याची मागणी केली होती.
प्रस्तावित MIDC अंतर्गत आयटी पार्क, अॅग्रीकल्चर पार्क, इंडस्ट्रियल हब तसेच लॉजिस्टिक पार्क विकसित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे राहून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महामंडळाकडून तहसील प्रशासनास संबंधित जमिनींची प्रतवारी, बागायत-जिरायत माहिती, न्यायालयीन बाबी तसेच अतिक्रमणासंदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अहवालानंतर पुढील भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, आमदार उत्तमराव जानकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत असल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत असून, प्रस्तावित MIDC मुळे माळशिरस तालुक्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


