सोलापूर विधान परिषद निवडणुकीत दुपारी २ पर्यंत ९३.५१ टक्के मतदान

Talk18 मराठी प्रतिनिधी दि. १८ जून :
सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ९३.५१ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.
मतदानासाठी एकूण ६१६ मतदार पात्र असून त्यापैकी ५७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ३०८ पुरुष मतदारांपैकी २८४ तर ३०८ महिला मतदारांपैकी २९२ जणांनी मतदान केले आहे.

मतदान केंद्रनिहाय पाहता मंगळवेढा व अकलूज केंद्रांवर १०० टक्के मतदान पूर्ण झाले आहे. तर दक्षिण सोलापूर येथे ९५.१२ टक्के, पंढरपूर येथे ९४ टक्के, उत्तर सोलापूर येथे ८८.८३ टक्के आणि कुर्डुवाडी येथे ९८.७५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या या निवडणुकीत मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याचे चित्र दिसून आले. उर्वरित वेळेतही मतदानाचा वेग कायम राहिल्यास अंतिम मतदानाची टक्केवारी विक्रमी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडत असून निवडणूक प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.
— प्रतिनिधी, Talk18 मराठी


