Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

माळीनगर ग्रामपंचायतीकडे घरासाठी हेलपाटे; 95% दिव्यांग करण करडेचे स्वप्न अधुरेच

Talk18 मराठी l माळीनगर प्रतिनिधी :

माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील 21 चारी जयसिंहनगर परिसरातील 95 टक्के दिव्यांग असलेल्या करण भारत करडे (वय 22) याचे स्वतःच्या घराचे स्वप्न अखेर अपुरेच राहिले. गावठाणात जागा व घरकुल मिळावे यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनेकदा माळीनगर ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला. मात्र जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांना वारंवार परत पाठवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

करण करडे हा आपल्या आई मनीषा करडे आणि वडील भारत करडे यांच्यासोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. गंभीर दिव्यांगत्वामुळे त्याची संपूर्ण काळजी आईलाच घ्यावी लागत होती. स्वतःचे घर असावे, या इच्छेने करणने ग्रामपंचायतीकडे अर्ज करून गावठाणात जागेची मागणी केली होती. मात्र त्याच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी करणचे निधन झाले. त्यामुळे स्वतःच्या घराचे त्याने पाहिलेले स्वप्न कायमचे अधुरे राहिल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिव्यांग करण करडे याला जागा व घरकुल मिळावे यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील बहुउद्देशीय अपंग संघटनेचे अध्यक्ष शहाजीराव माने-देशमुख तसेच प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख मारुती जानकर यांनीही ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. तरीही या प्रकरणात कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आलेला नाही.

विशेष म्हणजे, 95 टक्के दिव्यांग असूनही करण प्रत्येक निवडणुकीत आईच्या काखेत बसून मतदानासाठी जात होता. मतदान केंद्रावर अनेकांनी घरकुल व जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याच्या निधनापर्यंत ती आश्वासने पूर्ण झाली नाहीत, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

2023 मध्येही केला होता अर्ज

करण करडे यांच्या आई-वडिलांनी 10 नोव्हेंबर 2023 रोजी पंचायत समिती माळशिरसचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार माळशिरस यांच्याकडेही गावठाणातील जागेसाठी अर्ज दिला होता. मात्र त्यानंतरही कोणतीही सकारात्मक कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आता तरी माळीनगर ग्रामपंचायतीने करडे कुटुंबाला गावठाणात जागा उपलब्ध करून देत दिवंगत करण करडे यांचे घराचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी दिव्यांग संघटनांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button