
Talk18 मराठी l आण्णा भोसले :
मोहिते -पाटील घराण्याच्या राजकीय वाटचालीवर गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चा आणि टीका सुरू आहेत. विशेषतः रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सुरू असलेल्या भेटीगाठींवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क मांडले जात आहेत. मात्र, या सर्व टीकेच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कोणत्याही प्रकारची वैयक्तिक प्रतिक्रिया न देता संयमाची भूमिका कायम ठेवली आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील हे सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू आणि वडील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे राजकारणातील संघर्षापेक्षा संयम, संवाद आणि जनसंपर्काची परंपरा त्यांनी जपली असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
मोहिते-पाटील कुटुंबाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक दशके प्रभाव निर्माण केला. या प्रदीर्घ राजकीय प्रवासात सत्तेचे चढ-उतार आले, राजकीय समीकरणे बदलली आणि अनेक विरोधक निर्माण झाले; मात्र विरोधकांच्या टीकेला तत्काळ प्रत्युत्तर देण्याऐवजी वेळ आणि परिस्थितीला बोलू देण्याची भूमिका विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अनेकदा घेतली.
हीच राजकीय शिस्त रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या राजकीय वाटचालीतही दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
‘दौरे’ की जनसंपर्काची नवी सुरुवात? रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विविध भागांतील भेटीगाठींवर काही जणांकडून प्रश्न उपस्थित केले जात असले, तरी समर्थकांच्या मते राजकारणात जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष भेटीगाठी हा पारंपरिक आणि ऋणानुबंधाचा एक भाग आहे भाग आहे.
राजकारणात परिस्थिती बदलत असते. आजचे समीकरण उद्या तसेच राहीलच असे नाही. त्यामुळे कोणाच्या भेटीगाठींना ‘राजकीय वजन नाही’ किंवा ‘दिखावा’ असे ठरविण्यापेक्षा त्या भेटींमागील राजकीय आणि सामाजिक संवादाकडे पाहणे आवश्यक आहे.
टीकेला उत्तर नाही; वेळच देईल उत्तर
रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर कितीही राजकीय टीका झाली, तरी त्यांनी सार्वजनिक पातळीवर त्याला आक्रमक प्रत्युत्तर देणे टाळले आहे. ‘काम आणि जनसंपर्क’ हीच त्यांची भूमिका असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते.
मोहिते-पाटील घराण्याच्या राजकीय इतिहासाकडे पाहता, एखाद्या निवडणुकीतील पराभव किंवा बदललेले राजकीय समीकरण म्हणजे संपूर्ण राजकीय प्रवासाचा शेवट मानता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घराणी आणि नेत्यांनी चढ-उतार अनुभवले आहेत.
त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सध्याच्या भेटीगाठींकडे ‘अस्तित्वाचा प्रश्न’ म्हणून पाहायचे की आगामी राजकीय वाटचालीची तयारी म्हणून, हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.
दरम्यान, राजकीय टीका सुरू असतानाही रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी संयम सोडलेला नाही. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा संयमी बाणा आणि कै.शंकरराव मोहिते-पाटील यांच्या राजकीय वारशाची आठवण करून देणारी ही भूमिका समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


