Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

अफवांना बळी पडू नका; पुढील आठवड्यात सर्व थकीत रक्कम अदा होणार — ओमराजे बोत्रे-पाटील

Talk18 मराठी l आण्णा भोसले, चांदापुरी

ओंकार साखर कारखाना उद्योग समूह हा राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देणारा उद्योग समूह असून, आजघडीला या समूहामार्फत राज्यासह देशभरात १७ साखर कारखाने यशस्वीरित्या चालवले जात असल्याची माहिती ओमराजे बोत्रे-पाटील यांनी दिली. तसेच कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही ओंकार उद्योग समूहाचे कारखाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी जवळपास ७५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले असून, येत्या गळीत हंगामात १ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओंकार उद्योग समूहाची महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या वेगाने प्रगती सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या उद्योग समूहाशी हजारो ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्या, सुमारे २.१५ लाख कामगार, वाहन चालक, मुकादम व ठेकेदार तसेच ८ लाख शेतकरी जोडले गेले असल्याचे सांगण्यात आले. बंद पडलेले अनेक साखर कारखाने यशस्वीरित्या सुरू करून काटेकोर नियोजन आणि सक्षम प्रशासनाच्या बळावर चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व वाहतूकदारांना वेळेत पेमेंट देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

मात्र मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओंकार उद्योग समूह आणि बाबूराव बोत्रे-पाटील यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. “२ ते ३ हजार कोटी रुपये थकीत आहेत,” अशा प्रकारची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील १४० सहकारी व खासगी साखर कारखान्यांकडे १५ जानेवारी २०२६ नंतरची सुमारे २१०० कोटी रुपयांची रक्कम प्रलंबित असल्याचे सांगत, ओंकार उद्योग समूहाने चालविलेल्या १७ कारखान्यांकडून आतापर्यंत १८३० कोटी रुपये शेतकऱ्यांना व ७१० कोटी रुपये वाहतूकदारांना अदा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावर्षी समूहाचा ६ हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर झाला असून, पुढील वर्षी तो ७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या नवीन इथेनॉल धोरणामुळे मोलॅसिस आणि इथेनॉल विक्रीची जवळपास ६०० कोटी रुपयांची रक्कम येणे बाकी असल्याने ऊस बिलाच्या देयकास काहीसा विलंब झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पुढील आठवड्यात शेतकरी व वाहतूकदारांचे एकही रुपया थकीत राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोशल मीडियावर अफवा पसरवून शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरोधात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. शेतकरी व संबंधित घटकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी थेट कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन ओमराजे बोत्रे-पाटील यांनी केले.

“सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून ओंकार उद्योग समूहाची बदनामी केल्याप्रकरणी रविराज साबळे-पाटील यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर लवकरच अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ओमराजे बोत्रे-पाटील यांनी दिली.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button