Uncategorized

“थांब नाहीतर मारून टाकीन”… अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न; पोलिसांची झटपट कारवाई

अकलूज | शुक्रवार, दि. २६ जून २०२६

माळशिरस तालुक्यातील श्रीपूर-महाळुंग मायनर परिसरात शाळेत जाणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानामुळे आरोपीचा डाव फसला असून अकलूज पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २४ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे पायी शाळेत जात असताना आरोपी जीवन जयंत घाडगे (रा. महाळुंग मायनर) याने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. रस्त्यात अडवून बोलण्याचा बहाणा करत तिला धमकावले. “थांब, नाहीतर मारून टाकीन,” अशी धमकी देत तिचा विनयभंग केला आणि जबरदस्तीने ऊसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

घाबरलेल्या विद्यार्थिनीने धाडस दाखवत आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी जाऊन संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर शाळेत गेल्यावर तिने हा प्रकार मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे यांच्या निदर्शनास आणून दिला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधत निर्भया पथक आणि अकलूज पोलीस ठाण्याला तात्काळ माहिती दिली. त्यानंतर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच पॉक्सो कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके व पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या प्रमुख पीएसआय करिष्मा वनवे व अकलूज पोलिसांच्या पथकाने शोधमोहीम राबवत आरोपीला अटक केली. गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पीएसआय करिष्मा वनवे करीत आहेत.

Talk18 मराठीचे आवाहन : अल्पवयीन पीडितांची ओळख गोपनीय ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची कायदेशीर व सामाजिक जबाबदारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button