अकलूजमध्ये खळबळ! राणे हॉस्पिटलमधील चेकबुक चोरी करून तब्बल ९.४१ लाखांचा गंडा

Talk18 मराठी अकलूज प्रतिनिधी :
अकलूज येथील राणे हॉस्पिटलमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रासह बँक व्यवहारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हॉस्पिटलमधील ओ.पी.डी. कॅबिनमधून चोरट्यांनी चेकबुक लंपास करून त्याद्वारे तब्बल ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. रेवती नितीन राणे (रा. बायपास रोड, अकलूज) यांचे अकलूज येथे राणे हॉस्पिटल आहे. ऑक्टोबर २०२५ च्या सुमारास हॉस्पिटलमधील ओ.पी.डी. कॅबिनच्या टेबल ड्रॉवरमध्ये ठेवलेले ‘ऑब्स्टेट्रिक्स अँड गायना कॉलेज सोसायटी’च्या बँक ऑफ बडोदा शाखेचे चेकबुक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
सुरुवातीला हा प्रकार लक्षात आला नव्हता. मात्र, संबंधित खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉक्टर राणे यांना धक्का बसला. तपासाअंती चोरीस गेलेल्या चेकबुकचा गैरवापर करून तब्बल ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले.
या घटनेमुळे खासगी रुग्णालयांतील आर्थिक कागदपत्रांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच बँक व्यवहारांमध्ये अधिक सतर्कता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अकलूज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे.


