माळीनगर येथे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी व कायदेविषयक मार्गदर्शन

Talk18 मराठी l माळीनगर
माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे सावित्रीबाई फुले संसाधन केंद्र, यशवंतनगर यांच्या विद्यमाने दिनांक १२ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी माळशिरस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विधीज्ञ ॲड. अभिषेक चंदनशिवे, डॉ. विनया हाके, ॲड. गोपाळ लावंड तसेच संसाधन केंद्राच्या प्रमुख तनुजा पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिला भगिनींना महिलांचे कायदेशीर हक्क, विविध कायदेविषयक माहिती तसेच आरोग्याविषयी जनजागृती करून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता धाईंजे यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
माळीनगर येथे आयोजित महिला दिनाच्या या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्य व कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


