माळशिरस नगर पंचायतीच्या अपात्र नगरसेविका रेश्माताई टेळे यांना मंत्रालयाकडून स्थगिती; पुन्हा पदावर काम करण्याचा मार्ग मोकळा

माळशिरस | प्रतिनिधी – Talk18 मराठी
माळशिरस नगर पंचायतीच्या विद्यमान नगरसेविका रेश्माताई यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला मंत्रालयातील नगरविकास विभागाकडून स्थगिती मिळाल्याने त्या पुन्हा एकदा नगरसेविका म्हणून काम करण्यास सज्ज झाल्या आहेत. याबाबतचे अधिकृत पत्र आज माळशिरस नगर पंचायतीमार्फत रेश्माताई यांना प्राप्त झाले असून, या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी रेश्माताई यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली होती. संबंधित प्रकरणातील तक्रारदाराने यापूर्वीच सुमारे दोन वर्षांपूर्वी लेखी तक्रार मागे घेतल्याचे नमूद केले होते. त्यानंतर रेश्माताई यांनी नगर पंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात उघड भूमिका घेत मोर्चे, आंदोलने आणि लेखी तक्रारींच्या माध्यमातून आवाज उठवण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, रेश्माताई आणि त्यांचे पती सुरेश भाऊ, जे मनसेचे नेते म्हणून ओळखले जातात, यांनी या संपूर्ण प्रकरणात आपला लढा कायम ठेवला. अपात्रतेच्या आदेशानंतर त्या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र या निर्णयाविरोधात त्यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला.
अखेर ५ मार्च २०२६ रोजी मंत्रालयातील नगरविकास विभागाकडून या प्रकरणात स्थगिती देण्यात आली. त्यानंतर माळशिरस नगर पंचायतीकडून याबाबतचे पत्र आज रेश्माताई यांना देण्यात आले असून, त्या पुन्हा नगरसेविका म्हणून काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Talk18 मराठीशी संवाद साधताना रेश्माताई म्हणाल्या, “माळशिरसकरांच्या कररूपी विकास निधीचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात मी लढा सुरू ठेवणार आहे. या लढाईत थोडा वेळ लागला, मात्र माझ्या माळशिरसकर जनतेमुळे मला न्याय मिळाला. त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. सत्याला उशीर होऊ शकतो पण पराभव होत नाही, हा माझा ठाम विश्वास आहे.”
या निर्णयानंतर माळशिरस नगर पंचायतीच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


