महाराष्ट्र

अकलूजमध्ये मराठीचा जयघोष, शंकरराव मोहिते महाविद्यालयात ‘कॉलेज कट्टा’तून भाषेचा स्वाभिमान घुमला

अकलूज | प्रतिनिधी – Talk18 मराठी

“अभिमान मराठीचा, सन्मान साहित्याचा” या घोषवाक्याने आज अकलूजच्या शैक्षणिक वातावरणात मराठीचा नाद दुमदुमला. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘कॉलेज कट्टा’ या अभिनव उपक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…” या ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाच्या मनात जागा झाला.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…” या ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मराठी भाषेचा अभिमान प्रत्येकाच्या मनात जागा झाला.

महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात. याच परंपरेत ‘कॉलेज कट्टा’ या वेगळ्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना आपली साहित्यिक अभिव्यक्ती सादर करण्याची संधी देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि राजमाता आक्कासाहेब मोहिते पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमा पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर व ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. शिरीष शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या ‘कॉलेज कट्टा’ उपक्रमात एकूण १७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कविता, मनोगते आणि साहित्यिक विचारांच्या माध्यमातून आपल्या ओथंबलेल्या भावना व्यक्त केल्या. तरुणाईच्या आवाजातून मराठी भाषेचा स्वाभिमान आणि संस्कृतीचा वारसा ठळकपणे उमटला.

कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन प्रा. सौ. पताळे मॅडम यांनी केले. संपूर्ण सादरीकरणाचे नेटके नियोजन व प्रभावी निवेदन डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वय समितीचे सदस्य डॉ. निवृत्ती लोखंडे, प्रा. विनायक माने, प्रा. प्रसाद लोहार तसेच सर्व सहकारी प्राध्यापकांनी मोलाचे योगदान दिले. आभार प्रदर्शन डॉ. जनार्दन परकाळे यांनी मानले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित ‘कॉलेज कट्टा’ या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला नवी दिशा देत मराठी भाषेचा स्वाभिमान अकलूजच्या भूमीत पुन्हा एकदा दुमदुमवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button