शिवसेना शिंदे गटाचे दत्ता भैय्या मगर सभापती, राष्ट्रवादीच्या सौ. मनीषा मदने पाटील उपसभापती

माळशिरस (प्रतिनिधी – Talk18 मराठी
माळशिरस पंचायत समितीवर शिवसेना (शिंदे गट)चा झेंडा फडकला असून नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे. निमगाव गणाचे दत्ता भैय्या मगर यांची सभापतीपदी तर मनीषा मदने यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
ही निवडणूक खासदार धर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर तसेच डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (तुतारी), राष्ट्रवादी काँग्रेस तसेच रिपब्लिकन पक्ष अशी चार पक्षांची युती करण्यात आली होती.
या युतीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा परिषदेत एक आणि पंचायत समितीत दोन उमेदवार बहुमताने विजयी झाले.
दरम्यान, ज्या घरात आमदार आणि खासदार आहेत, त्या घरातील व्यक्तींना सभापती किंवा उपसभापती पद देण्याऐवजी ही संधी कार्यकर्त्यांना मिळावी, या हेतूने आमदार उत्तमराव जानकर आणि खासदार धर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवत दत्ता भैय्या मगर यांना सभापतीपदी संधी दिली, तर मनीषा मदने यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली.
या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी प्रचार प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच तालुका उपप्रमुख तानाजी भोळे पाटील, व्हीजीएनटी तालुकाप्रमुख शहाजी आप्पा काळे, दिगंबर साठे, गणेश खंडागळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन प्रचार केला.
विकासकामांचे आश्वासन देत कार्यकर्त्यांनी केलेल्या होम टू होम प्रचारामुळे हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांनी दिली.



