Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

वयाच्या ८१ व्या वर्षी जगूबाई जानकर यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड

सौं.शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मान

: शनिवार, १० ऑक्टोबर २०२६

Talk18 मराठी तरंगफळ प्रतिनिधी :

वयाच्या ८१ व्या वर्षीही सामाजिक कार्याची ऊर्मी, उत्साह आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी कायम जपणाऱ्या श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांनी बिनविरोध उपसरपंचपदी निवड होण्याचा बहुमान मिळवला आहे. तरंगफळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या या निवडीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.


तरंगफळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध निवडीच्या दिशेने गेली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. सुनील विठ्ठल जाधव यांनी बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली, ग्रामपंचायत अधिकारी श्री. एस. एच. भांडवलकर यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले.

वयाच्या ८१ व्या वर्षीही समाजसेवेचा उत्साह कायम

श्रीमती जगूबाई जानकर यांचा सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. पती मारुती जानकर हयात असताना त्यांनी मायाक्का देवीच्या सवासणी कार्यक्रमाचे परिसरात विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या पद्धतीने आयोजन केले होते. पतीच्या निधनानंतरही त्यांनी खचून न जाता आपला मुलगा श्री. गोरख जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कुटुंबाला आधार दिला.

वयाची ८१ वर्षे पूर्ण होऊनही त्यांचा उत्साह आजही तरुणांना प्रेरणा देणारा आहे. ट्रॅक्टर चालवणे, शेतातील पिकांची गोफणीद्वारे राखण करणे, नाती-नातवांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करणे तसेच त्यांच्या लग्नसमारंभात नातेवाईक आणि मित्रपरिवाराची आपुलकीने काळजी घेणे, अशा विविध जबाबदाऱ्या त्या आजही उत्साहाने पार पाडतात. आज त्या पणजी झाल्या आहेत; मात्र त्यांच्यातील कार्यतत्परता आणि समाजसेवेची भावना अद्याप कायम आहे.

दिव्यांग बांधवांच्या सेवाकार्यातही कुटुंबाचे योगदान

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील दिव्यांग सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गोरख जानकर हेही आपल्या आईच्या मार्गदर्शनातून समाजकार्य करत आहेत. दिव्यांग बांधवांच्या अडचणींच्या काळात त्यांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना आवश्यक सहकार्य करणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

आईकडून मिळालेल्या संस्कारांची आणि समाजसेवेच्या प्रेरणेची जपणूक करत गोरख जानकर यांनी दिव्यांग बांधवांसाठी केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. त्यामुळे जगूबाई जानकर यांची उपसरपंचपदी झालेली निवड ही केवळ एका पदाची निवड नसून, त्यांच्या दीर्घ सामाजिक वाटचालीचा गौरव असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार.

श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांच्या निवडीबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष मा. सौ. शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तरंगफळचे सरपंच श्री. नारायण तात्या तरंगे, बीज उत्पादक संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव देशमुख, व्हाइस चेअरमन श्री. सुजित तरंगे, श्री. दिलीप शिरसाट, थोर दिव्यांग सेवक श्री. गोरख जानकर, सागर बोडरे, सतीश कांबळे, शशिकांत साळवे, सुहास तरंगे, सर्जेराव तरंगे, विलास तरंगे यांच्यासह तरंगफळ येथील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीमती जगूबाई मारुती जानकर यांच्या बिनविरोध उपसरपंचपदी निवडीबद्दल Talk18 मराठी परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button