‘व्हॉईस ऑफ मीडिया’मुळे पत्रकारितेला नवी दिशा – सोलापूर अधिवेशनात संदीप काळेंचे प्रतिपादन
Talk18 मराठी /आण्णा भोसले :सोलापूर येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या वतीने जिल्हा पदाधिकारी व सदस्यांसाठी एकदिवसीय जिल्हा अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात शेकडो पदाधिकारी व पत्रकारांनी सहभाग नोंदवला. यावेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी पत्रकारितेवर जागतिक स्तरावर आलेल्या संकटांवर भाष्य करताना, गेल्या पाच वर्षांत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने उचललेली पावले पत्रकारितेचा स्तर उंचावणारी व ऐतिहासिक असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातून सुरू झालेली ही संघटना आज ५८ देशांपर्यंत पोहोचली असून येत्या दोन वर्षांत १९५ देशांत पत्रकारितेचा झेंडा फडकवण्याचा संकल्प असल्याचे संदीप काळे यांनी स्पष्ट केले. संघटनेची भक्कम बांधणी, कृतिशील उपक्रम आणि प्रत्येक पत्रकाराला आपलेपणाची भावना देणारी रचना यामुळे हा प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार आश्विनी कोळेकर यांनी पत्रकारितेतील संवेदनशीलतेवर भर देत लोकशाही बळकट करण्यासाठी संघटनेचे कार्य मोलाचे असल्याचे सांगितले. पत्रकारिता अभ्यासक अभय दिवाणजी यांनी पत्रकारांचे प्राथमिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला, तर ‘तरुण भारत’चे संपादक प्रशांत माने यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करत अधिक सखोल प्रयत्नांची गरज व्यक्त केली.
या अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यासाठी विविध महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच, आगामी दोन महिन्यांची कार्यरूपरेषा सर्व तालुकाध्यक्षांनी सादर केली. यामध्ये उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष सचिन राठोड, सांगोला तालुकाध्यक्ष कैलास हिप्परकर, माळशिरस तालुकाध्यक्ष आण्णा भोसले, पंढरपूर तालुकाध्यक्ष सुरज कौलगे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष हुसेनी भाईजान नदाफ, मंगळवेढा तालुकाध्यक्ष रोहिदास भोरकडे, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष बनसिद्ध देशमुख आणि मोहोळ तालुकाध्यक्ष विजय पुजारी यांनी आपल्या तालुक्यातील कार्याचा आढावा मांडला.
या अधिवेशनाला जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे, जिल्हा उपाध्यक्ष तौफिक नदाफ, सोलापूर महानगराध्यक्ष धनराज बगले, राज्य कोर टीम सदस्य सुरज कौलगे यांच्यासह रेडिओ विंग जिल्हाध्यक्ष शहाजोया सुभेदार, उर्दू विंग जिल्हाध्यक्ष वजाहत अब्दुल सत्तार, महिला विंग सोलापूर महानगराध्यक्ष श्रेया माशाल तसेच विविध विंग, तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या अधिवेशनात पत्रकारितेच्या भविष्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.





