
पाणीटंचाई, लोडशेडिंग आणि शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा; प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
दिनांक : २२ सप्टेंबर २०२६ वार : मंगळवार
Talk18 मराठी सोलापूर | प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि टंचाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, टँकर, जनावरांसाठी चारा तसेच आगामी काळातील संभाव्य टंचाईच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी तालुक्यातील दुष्काळ व टंचाईशी संबंधित विविध प्रश्न प्रशासनासमोर मांडले. नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
लोडशेडिंगचा प्रश्नही मांडला
माळशिरस तालुक्यातील लोडशेडिंगचा प्रश्न सोडवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार जानकर यांनी बैठकीत मांडली. शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची मागणी
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही बैठकीनंतर सांगितले असून, नुकसानीचे सर्वेक्षण व पुढील उपाययोजनांबाबत प्रशासनाला तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
माळशिरस तालुक्यातील पाणीटंचाई, शेती, वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने वेळेत कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार उत्तमराव जानकर यांनी बैठकीत मांडली.


