रोटरी क्लब अकलूज व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग कारखान्याचा सामाजिक उपक्रम; महिला कामगारांची कॅन्सर तपासणी

Talk18 मराठी | श्रीपूर
ऊस तोडणी महिला कामगारांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर रोटरी क्लब ऑफ अकलूज व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्याच्या परिसरात ऊस तोडणी महिला कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला महिला कामगारांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख संदीप लोणकर, डॉ. अभिजीत मगर, अजित वीर, मनीष गायकवाड, अभिषेक टेके, ओजस दोबाडा, गजानन जंवजाळ, यबाजी सर उपस्थित होते.
तसेच पांडुरंग कारखान्याचे कृषी अधिकारी संतोष कुमठेकर, चीफ अकाउंटंट रवींद्र काकडे, कृषी विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पोफळे, डॉ. प्रमोद पवार, भीमराव बाबर यांच्यासह कॅन्सर तपासणीसाठी कराड मेडिकल कॉलेज, सातारा येथून आलेले डॉ. आरुषी शर्मा, डॉ. नेहा पडवळ, सागर पवार, डॉ. तनवी डांगे, दिशा पारगे, सुषमा शेटे, शितल पोळ, प्रिया कदम, माधुरी गायकवाड, गुंजन पाटील आदी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यासोबतच कॅन्सरची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना व वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कारखान्याच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ कारखान्याचे कर्मचारी तसेच ऊस तोडणी महिला कामगारांनी घेतला. अनेक महिलांनी तपासणी करून आरोग्याबाबत जागरूकता व्यक्त केली. वेळीच तपासणी केल्यास कॅन्सरवर यशस्वी उपचार शक्य असल्याचे मत उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केले. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पांडुरंग साखर कारखाना नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असून, याअंतर्गत यापूर्वी ऊस तोडणी महिला कामगारांना साड्या, लहान मुलांना स्वेटर्स आदींचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य व सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
—
✍️ Talk18 मराठी


