वेळापूर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड

₹३०,६७,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वेळापूर | प्रतिनिधी – Talk18 मराठी
वेळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वेळापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ३० लाख ६७ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारास करण्यात आली.पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस नितीन लिंगडे, पो.हवा. बसवराज बिराजदार व पो.ना. अविनाश मोरे यांना अकलूज रोडवर संशयास्पद स्थितीत उभे असलेले अशोक लेलँड कंपनीचे चारचाकी वाहन (MH-42-BF-2887) आढळून आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठवलेला असल्याचे निदर्शनास आले.सदर वाहनामध्ये ६२ बारदान्यांमध्ये व ३ पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये विमल पानमसाला, आर.एम.डी. सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित गुटखा सापडला. यामध्ये गुटख्याची अंदाजे किंमत ₹२९,६७,९२० इतकी असून, यासोबतच ₹१० लाख किंमतीचे अशोक लेलँड वाहन, तसेच वाहनातून मिळालेले VIVO कंपनीचे दोन मोबाईल फोन (₹२०,०००) असा एकूण ₹३०,६७,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश लवटे (सोलापूर) यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून जप्त मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तपासादरम्यान वाहनचालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत संबंधित चालक, वाहनमालक व गुटखा मालकांविरोधात वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यादवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब गोसावी व त्यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब गोसावी करत आहेत.


