498(A) सह विविध कलमांतील गुन्ह्यात सर्व ६ आरोपी निर्दोष मुक्त

Talk18 मराठी माळशिरस प्रतिनिधी :
माळशिरस येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय क्रमांक ४ यांच्या न्यायालयाने सन २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक छळ प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील त्रुटींचा सखोल विचार करून हा निकाल दिला.
सदर प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 498(A), 323, 504, 506, 507, 509 तसेच कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींमध्ये अनिल प्रल्हाद माळवदे, प्रल्हाद राजाराम माळवदे, सुनील प्रल्हाद माळवदे, मंगल प्रल्हाद माळवदे, पूजा सुनील माळवदे आणि कृष्णा बळीराम नेटके यांचा समावेश होता.
फिर्यादी महिलेने पती व सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ, मारहाण, शिवीगाळ तसेच विनयभंगाचे आरोप केले होते. या प्रकरणात फिर्यादीसह एकूण सात साक्षीदारांची न्यायालयात तपासणी करण्यात आली. यामध्ये नातेवाईक, तपासी अधिकारी आणि इतर साक्षीदारांचा समावेश होता.
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲड. सुमित सावंत यांनी प्रभावी बाजू मांडली. फिर्यादीच्या जबाबात आरोपींविरुद्ध कोणताही ठोस, स्वतंत्र आणि विश्वासार्ह पुरावा नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तपास प्रक्रियेदरम्यान घटनास्थळ पंचनामा करताना झालेल्या त्रुटी, स्वतंत्र साक्षीदारांचे जबाब नोंदवले न जाणे आणि साक्षीदारांच्या जबाबांमधील गंभीर विसंगती याकडेही बचाव पक्षाने लक्ष वेधले.
यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवत म्हटले की, अभियोजन पक्षाकडून आरोपींविरुद्धचा गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयश आले आहे. फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगतीमुळे अभियोजन पक्षाची बाजू विश्वासार्ह वाटत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. परिणामी संशयाचा फायदा देत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
— Talk18 मराठी


