
Talk18 मराठी l आण्णा भोसले चांदापुरी
चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ होते.
यावेळी बोलताना चेअरमन बाबुराव बोञे पाटील म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याची मला जाणीव आहे. ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार आणि कर्मचारीवर्ग यांचे हित जपणारा ओंकार परिवार आहे. गेल्या सहा वर्षांपासून साखर कारखानदारीच्या क्षेत्रात कार्यरत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिला असून वाहतूकदारांच्या समस्या सोडविल्या आहेत. तसेच कर्मचारीवर्गाला २० टक्के पगारवाढ दिली आहे.
२०२६-२७ च्या गळीत हंगामात ऊसाला सर्वाधिक दर देण्यासाठी कटिबद्ध
२०२६-२७ च्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे सर्वाधिक दर देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर आणि १०० रुपये देण्यात येतील, असेही बाबुराव बोञे पाटील यांनी सांगितले.
ओंकार परिवाराच्या माध्यमातून प्रतिदिन २ लाख ५ हजार टन ऊस गाळप, २३ लाख लिटर इथेनॉल निर्मिती आणि २२८ मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. ओंकार परिवार हा देशातील सर्वात मोठा साखर उद्योग आहे. त्याचबरोबर मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आरोग्याच्या अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार साखर कारखान्याला घालावा, असे आवाहनही बाबुराव बोञे पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील, प्रा. शारदाताई बोञे पाटील, जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, तेजस्विनी बर्गे, तरंगफळचे माजी सरपंच रावसाहेब तरंगे, नारायण करचे, सर्जेराव पवार, भगवान सुळ, संजय वाघमोडे यांच्यासह बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


