Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

सृजनरंग महोत्सवातील फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ८८ विद्यार्थ्यांचा सहभाग

Talk18 मराठी l अकलूज प्रतिनिधी :

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे आयोजित ‘सृजनरंग महोत्सव २०२६-२७’ अंतर्गत घेण्यात आलेल्या फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कला, वाणिज्य, विज्ञान तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील तब्बल ८८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या छायाचित्रण कौशल्याचे दर्शन घडविले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालय परिसरात फोटोग्राफी स्पर्धेची प्रत्यक्ष सुरुवात प्रसिद्ध फोटोग्राफर अभिषेक भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील निसर्ग, वास्तू, विद्यार्थी जीवन आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले. मोबाईल व कॅमेऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि कलात्मक दृष्टिकोनाचा अनोखा संगम छायाचित्रांतून साकारला.

यावेळी सृजनरंग महोत्सव समन्वयक डॉ. विश्वनाथ आवड, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर ताटे-देशमुख, हिंदी विभाग प्रमुख डॉ. निवृत्ती लोखंडे, तसेच फॅकल्टी स्पर्धा प्रमुख प्रा. विजय शिंदे, प्रा. दिपराज देशमुख, प्रा. धिरज गुरव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ‘सृजनरंग महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. फोटोग्राफी स्पर्धेला मिळालेला भरघोस प्रतिसाद हा विद्यार्थ्यांमधील वाढत्या कलात्मक जाणिवेचा आणि सर्जनशीलतेचा प्रत्यय देणारा ठरला.

छायाचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी निसर्ग, परिसर आणि विद्यार्थी जीवनातील क्षणांना दिलेली कलात्मक मांडणी हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button