
Talk18 मराठी l आण्णा भोसले :
अकलूज : विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे आणि जिवंत काडतुसे विकणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १७ पिस्तुले व ४७ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच या कारवाईत टाटा नेक्सॉन कारसह एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू असतानाही आरोपींकडे विनापरवाना शस्त्रे आढळून आली. अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या कारवाईची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.परिते येथून कारवाईला सुरुवातअकलूज पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुरुवातीला १४ ऑगस्ट रोजी परिते येथील विकास वजाळे याला कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
चौकशीत त्याने ही शस्त्रे राहुल माने याच्याकडून घेतल्याचे तसेच विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी करकंब, सांगोला, अकोले खुर्द, मिरज आणि कर्नाटक येथे कारवाई करत शस्त्रे जप्त केली.
दरम्यान, विकास वजाळे याने मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सोनगीर, धुळे येथे सापळा रचून मेहता याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार अग्निशस्त्रे आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
त्यानंतर राहुल माने यालाही टेंभुर्णी परिसरातून अटक करण्यात आली.
सहा आरोपी अटकेत; दोघे फरार
या कारवाईत विकास कैलास वजाळे (३१, रा. परिते, ता. माढा), राहुल सतीश माने (३४, रा. मिरज), महादेव बाळासाहेब कोरके (३०, रा. करकंब), विजय सदाशिव किरणी (३४, रा. शिवणी, कर्नाटक), अनिल पंचलाल मेहता (३१, रा. राजगड, मध्य प्रदेश) आणि सुमित नाना लवटे (१९, रा. भुईटे वस्ती, सांगोला) यांना अटक करण्यात आली आहे.
तर प्रदीप पांडुरंग माने आणि शनि भारत बनसोडे हे दोघे फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.


