Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

दुष्काळाच्या घोषणांपेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी १ लाखांची मदत द्या

30 सप्टेंबर 2026 l बुधवार

Talk18 मराठी अकलूज | प्रतिनिधी:

माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अकलूज येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माळशिरस, पंढरपूर तालुक्यांसह जिल्ह्यातील विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

गेल्या काही आठवड्यांपासून पावसाचा मोठा खंड पडल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला असून सोयाबीन, तूर, कापूस यांसह विविध पिकांचे नुकसान होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. प्रशासनानेही जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे नमूद करून पाहणी व अहवालाची प्रक्रिया सुरू केली आहे.

पार्श्वभूमीवर केवळ दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून थांबू नये, तर शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने आर्थिक मदत जमा करावी, अशी ठाम मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.

फायरब्रँड शेतकरी नेते तथा माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाचा एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन निर्णयाची प्रत जाळून शासनाच्या दुष्काळविषयक भूमिकेचा आंदोलकांनी निषेध केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी सोलापूर आणि पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या नावे तसेच प्रांताधिकारी अकलूज, तहसीलदार माळशिरस आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

  • शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
  • शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई तात्काळ खात्यात जमा करावी
  • .२०२४ व २०२५ सालचा रखडलेला १०० टक्के पीकविमा तात्काळ द्यावा.नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांचे CIBIL खराब होऊ देऊ नये
  • .२०१९ पूर्वीपासून कर्जबाजारी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत आणावे.पुनर्गठित व रूपांतरित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्यावी
  • .शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
  • पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करावी.पीककर्जदार शेतकऱ्यांकडून अवास्तव व्याज आकारणाऱ्या बँकांवर आळा घालावा.
  • शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जुनी चार-ट्रिगर पीकविमा योजना लागू करावी.
  • २०२६ सालचा पीकविमा तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना द्यावा.जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा.
  • गावागावांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
  • शेतकऱ्यांना २४ तास वीज द्यावी आणि नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलावे.
  • शेतमजूर व भूमिहीनांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.

या मागण्यांची शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. “दुष्काळाच्या पोकळ घोषणा नकोत, तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत हवी,” या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माळशिरस प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटना माळशिरस तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड, दत्ताजी गोरे, रणजित दादा गायकवाड, तालुका मराठासेवक रणजितसिंह कदम-पाटील, प्रदीप कोकाटे-पाटील, आकाश पराडे, माऊली कोकाटे, संकेत सोनवणे, विकी खंडागळे, काकासो घाडगे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून प्रत्यक्ष आर्थिक मदत न मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्रात मंत्र्यांना फिरू देणार नाही—

शिवराम गायकवाड, तालुकाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना, माळशिरस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button