
शाळेच्या विकासासाठी बांधकाम साहित्य देत जपली सामाजिक बांधिलकी; ग्रामस्थांतून कौतुक
Talk18 मराठी l शनिवार 15 ऑगस्ट:
माळशिरस प्रतिनिधी : कै. मारुती बिरू जानकर यांच्या स्मरणार्थ गोरख जानकर यांनी जिल्हा परिषद शाळा, वाघमोडे वस्तीच्या विकासासाठी तब्बल ₹६० हजारांची देणगी देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या दातृत्वाचे शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या स्टेजच्या पाठीमागील पत्रा वाऱ्यामुळे उडून गेल्याने त्या ठिकाणी भिंत बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. तसेच दोन वर्गांच्या मधील जागेचा योग्य उपयोग करण्यासाठी तेथे भिंत बांधून कोबा करण्याची गरज होती.
याबाबत गोरख जानकर यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी कोणत्याही शासकीय योजनेची किंवा मदतीची वाट न पाहता तत्काळ मदतीचा हात पुढे केला. “मी साहित्य आणून देतो, तुम्ही काम सुरू करा,” असा शब्द देत त्यांनी तातडीने बांधकाम साहित्य उपलब्ध करून दिले.
त्यांनी विटा, खडी, क्रश, सिमेंट आदी आवश्यक साहित्य स्वतःच्या खर्चातून उपलब्ध करून दिले. या साहित्याची एकूण किंमत जवळपास ₹६० हजार आहे. त्यांच्या सहकार्यामुळे स्टेजच्या पाठीमागील भिंतीचे काम पूर्ण झाले असून दोन वर्गांच्या मधील जागेचीही भिंत बांधून कोबा करण्यात आला आहे.
या कामामुळे शाळेला साहित्य व धान्य ठेवण्यासाठी प्रशस्त नवीन खोली उपलब्ध झाली आहे. तसेच दोन वर्गांच्या मधील जागेचा योग्य वापर झाल्याने शाळेचा परिसर अधिक मोकळा, प्रशस्त आणि सुबक झाला आहे.
शाळेच्या स्थापनेपासून प्रथमच एवढी मोठी वैयक्तिक देणगी
उक्तीप्रमाणे गोरख जानकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे. त्यांनी केलेले हे कार्य शाळेच्या विकासाच्या इतिहासात कायमस्वरूपी स्मरणात राहील.
कै. मारुती बिरू जानकर यांच्या स्मरणार्थ शाळेसाठी दिलेल्या या अमूल्य योगदानाबद्दल गोरख जानकर यांचे शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


