
Tal18 मराठी l आण्णा भोसले l २३ जुलै l गुरुवार :
चांदापुरी गावचे भूमिपुत्र, माजी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) जवान तथा अत्यंत मनमिळाऊ, हसतमुख आणि सर्वांना आपुलकीने वागवणारे आद. हनुमंत कोळपे यांचे दि. २२ जुलै रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चांदापुरी गावावर शोककळा पसरली आहे.
हनुमंत कोळपे यांनी ४ एप्रिल १९९१ रोजी CRPF मध्ये जवान म्हणून भरती होऊन देशसेवेची सुरुवात केली. राजस्थान येथील पहिल्या नियुक्तीनंतर त्यांनी पंजाब, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, इलाहाबाद, वाराणसी, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र अशा देशाच्या विविध भागांत निष्ठेने सेवा बजावली. त्यांच्या सेवाकाळातील अखेरची नियुक्ती छत्तीसगडमधील सुकमा व दंतेवाडा या अतिनक्षलग्रस्त भागात होती. अत्यंत कठीण परिस्थितीत राष्ट्राच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
उच्चशिक्षित असलेल्या कोळपे साहेबांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, साधा आणि आपुलकीचा होता. ते नेहमीच हसतमुख राहून प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधत. त्यामुळे ते संपूर्ण गावाचे लाडके व्यक्तिमत्त्व बनले होते. त्यांच्या जाण्याने केवळ कोळपे कुटुंबानेच नव्हे, तर संपूर्ण चांदापुरी गावाने एक कर्तव्यदक्ष सैनिक, सच्चा माणूस आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे. या दुःखद प्रसंगी कोळपे कुटुंबियांच्या दुःखात Talk18 मराठी परिवार व व्हॉइस ऑफ मीडिया, माळशिरस तालुका मनःपूर्वक सहभागी असून, ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि परिवारास हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच विनम्र प्रार्थना. 🙏🌹


