Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

नातेपुते येथे नारीशक्तीचा सन्मान; राजकुमार हिवरकर पाटील यांच्या माध्यमातून ३२२५ महिलांना लाभ

दिनांक : 23 जून 2026 | वार : मंगळवार

नातेपुते (प्रतिनिधी) – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या शिलाई मशीन वाटप उपक्रमाचा समारोप उत्साहात पार पडला. “उत्सव नारीशक्तीचा” या विशेष अभियानांतर्गत तब्बल ३,२२५ महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर-पाटील यांनी सांगितले की, १ मे ते १५ मे या कालावधीत लाभार्थी महिलांना केवळ आधार कार्डच्या आधारे शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला ११ मेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र महिलांच्या आग्रहास्तव कार्यक्रमाला आणखी चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आणि १५ मेपर्यंत वाटप सुरू ठेवण्यात आले. या अतिरिक्त कालावधीतही महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. शिंगाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कुटुंबाचा भक्कम पाया असलेल्या महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य या उपक्रमातून होत आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून हजारो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वावलंबी बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नातेपुते पोलीस ठाण्याच्या पीएसआय सोनल मोरे यांनीही महिलांना उद्देशून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ५० टक्के सवलतीत उपलब्ध करून दिलेल्या शिलाई मशीनमुळे नातेपुते पंचक्रोशीतील महिलांना मोठा लाभ होणार असून त्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतील. तसेच हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी डॉ. नरेंद्र कवितके यांचे विशेष आभार मानले.

यावेळी महात्मा फुले दूध संघाचे चेअरमन रणजीत दादा जठार, भाजपाचे सुनीलजी बनकर, मनोज जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख पोपटराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे रियाज शेख, बचत गटांच्या सहयोगिनी सौ. धांहिंजे, सौ. कुलकर्णी मॅडम, सागर दादा भोसले, अजय ढेंबरे, मंगेश कांबळे, विजय दादा ढेंबरे, रामदास बरडकर, संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, हजारो कुटुंबांच्या उत्पन्नवाढीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button