माळशिरसच्या राजकारणात नवा ट्विस्ट? आमदार उत्तमराव जानकर यांच्या भाजप जवळीकतेने राम सातपुते गोटात अस्वस्थता!

Talk18 मराठी l १२ जून २०२६ l शुक्रवार
माळशिरस तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा नव्या वळणावर येताना दिसत आहे. अनेक वर्षे मोहिते पाटील गटाच्या विरोधात संघर्ष करणारे आमदार उत्तमराव जानकर यांच्या वाढत्या भाजप जवळीकतेमुळे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या गोटात राजकीय अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
माळशिरस तालुक्यात दीर्घकाळ मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक अशा दोन प्रमुख राजकीय गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. या विरोधी गटाचे नेतृत्व उत्तमराव जानकर यांनी केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाची जागा आरपीआय (आठवले गट) कडे गेल्यानंतर मोहिते पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत रामभाऊ सातपुते यांनी विजय मिळवला होता.
मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ मोहिते पाटील गटाविरोधात भूमिका घेणारे उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटील गटाशी राजकीय युती केली. या नव्या समीकरणाचा थेट परिणाम निवडणुकीवर झाला आणि रामभाऊ सातपुते यांचा पराभव करत उत्तमराव जानकर यांनी विजय मिळवला.
आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मोहिते पाटील गटाने विश्वासघात केल्याची भावना व्यक्त करत जानकर यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जानकर यांनी हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना त्यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे जानकर आणि भाजप यांच्यातील वाढत्या जवळीकतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमुळे माळशिरस तालुक्यात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. विशेषतः रामभाऊ सातपुते यांच्या समर्थकांमध्ये या बदलत्या राजकीय घडामोडींविषयी अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात उत्तमराव जानकर आणि भाजप यांचे संबंध कोणते नवे राजकीय चित्र उभे करतात, याकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.
— Talk18 मराठी


