
Talk18 मराठी lमाळशिरस | सोमवार, दि.1जून 26
माळशिरस येथे विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या वतीने आयोजित संवाद बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. मराठी भाषा, संस्कृती, उद्योग-व्यवसाय आणि शैक्षणिक विकास या विषयांवर सखोल चर्चा करत विविध उपक्रमांचा आराखडा यावेळी मांडण्यात आला.

बैठकीत विश्वमंगल मराठी फाउंडेशनचे पदाधिकारी भीमाशंकर कुंभार यांनी संस्थेची कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि संघटनात्मक रचना याविषयी सविस्तर माहिती दिली. मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फाउंडेशन कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उद्योग विभाग प्रमुख भूषण कुलकर्णी यांनी विश्वमंगल मराठी बिझनेस फोरमची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली. माळशिरस तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजकांचा डेटाबेस तयार करून त्यांच्यात व्यवसायाची देवाणघेवाण, परस्पर संवाद, मार्गदर्शन आणि उद्योगवृद्धीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावपातळीवरील व्यवसायांना सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हा फोरम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित येलमार यांनी विश्वमंगलच्या ‘ज्ञानमंदिर सुधारणा’ कार्यक्रमाची माहिती देताना जिल्हा परिषद शाळांच्या विकास, गुणवत्ता वाढ आणि भौतिक सुविधांच्या उन्नतीसाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील शाळांच्या प्रगतीसाठी उद्योजक आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात बोलताना आमदार सुभाष बापू देशमुख यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन, तसेच स्थानिक उद्योग-व्यवसायांना चालना देण्यासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

बैठकीत नातेपुते, अकलूज, माळशिरस आणि माळीनगर या चार नगरपरिषद क्षेत्रांमध्ये विश्वमंगल मराठी बिझनेस फोरमची स्वतंत्र चॅप्टर्स सुरू करण्याबाबत प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. या माध्यमातून तालुक्यात व्यावसायिकांचे मजबूत जाळे निर्माण होऊन स्थानिक तरुणांना उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि माळशिरस तालुका आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी पांडुरंग तात्या वाघमोडे यांनी माळशिरस तालुक्याच्या वतीने विश्वमंगल मराठी बिझनेस फोरमला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच तालुक्यात विश्वमंगलचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस अजित येलमार, भूषण कुलकर्णी, पांडुरंग वाघमोडे, अशोक बोगाळे, मुकुंद कुलकर्णी, विकास धाईजे, ॲड. पी. ई. कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि मराठी भाषाप्रेमी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— Talk18 मराठी”लोकांच्या प्रश्नांना आवाज देणारे व्यासपीठ”


