
चांदापुरी | प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹१५०० आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र माळशिरस तालुक्यातील अनेक गावांमधील पात्र महिलांच्या खात्यावर मार्च आणि एप्रिल महिन्यांचे मिळून ₹३००० रुपये अद्याप जमा झाले नसल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून १५ मे रोजी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले. मात्र अनेक पात्र महिलांना पैसे न आल्याने त्या संभ्रमात पडल्या आहेत. विशेष म्हणजे संबंधित महिलांनी केवायसी, आधार लिंक, बँक तपशील तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळोवेळी करूनही रक्कम जमा झाली नसल्याचा आरोप होत आहे.
दरवेळी शासनाकडून नवनवीन अटी व त्रुटी सांगितल्या जातात. कधी केवायसी, कधी आधार लिंक, तर कधी कागदपत्रे अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे महिलांना वारंवार शासकीय कार्यालये व बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
“सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे मिळत नसतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल अनेक महिलांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाने याबाबत तातडीने स्पष्टिकरण देऊन पात्र महिलांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Talk18 मराठी
जनतेच्या प्रश्नांना आवाज


