महावितरणचा गोंधळ कायम; आमदार उत्तमराव जानकर यांच्या इशाऱ्यानंतरही महावितरण बेफिकीर

Talk18 मराठी l आण्णा भोसले :
माळशिरस तालुक्यातील वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत, थेट विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून वीज, पाणी आणि आरोग्याच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने, माळशिरस तालुक्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, एवढ्या हालचालींनंतरही तालुक्यातील महावितरणचा सावळा गोंधळ काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
या पार्श्वभूमीवर आमदार जानकर यांनी सोलापूर येथील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांची वेळापूर येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि सक्त सूचना देत, “संध्याकाळी ६ ते १० या वेळेत वीजपुरवठा खंडित करू नये,” असे आदेश दिले होते.
मात्र, आमदारांच्या स्पष्ट सूचनांनंतरही महावितरण प्रशासनाकडून आदेशांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये अद्यापही संध्याकाळच्या महत्त्वाच्या वेळेत वीज खंडित केली जात असून, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वीजपुरवठ्याच्या या सततच्या अडथळ्यांमुळे शेतीची कामे विस्कळीत होत असून, घरगुती कामांवर व व्यवसायांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे आणखी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत माळशिरस तालुक्यातील शेतकरी असून, प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


