आमदार उत्तमराव जानकर यांच्या समवेत नूतन सभापती दत्ता भैय्या मगर यांची उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री गोगावले यांची भेट

Talk18 मराठी प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी आमदार उत्तमराव जानकर यांच्या समवेत नूतन सभापती पै. दत्तात्रय (दत्ता भैय्या) मगर यांनी मुंबईत विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण भेटी देत विकासाच्या दृष्टीने पुढाकार घेतला.
आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन नूतन सभापती दत्ता भैय्या मगर यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी आमदार उत्तमराव जानकर, सांगोला येथील माजी आमदार शहाजी बापू पाटील तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग तात्या वाघमोडे उपस्थित होते. या भेटीदरम्यान तालुक्यातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच आमदार उत्तमराव जानकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रकल्प, आगामी योजना तसेच जनतेच्या प्राधान्याच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली.
याचबरोबर कॅबिनेट मंत्री तथा फळ उत्पादन विभागाचे प्रमुख भरतशेठ गोगावले यांचीही भेट घेऊन तालुक्यातील शेती व फलोत्पादन क्षेत्राच्या विकासावर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे तसेच फळबागांच्या विस्तारासाठी योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत सकारात्मक संवाद झाला.
या चर्चेत स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी, बाजारपेठेतील संधी तसेच साठवणूक व प्रक्रिया सुविधांची आवश्यकता यावरही विशेष भर देण्यात आला.
या प्रसंगी कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार उत्तमराव जानकर व नूतन सभापती दत्ता भैय्या मगर यांच्या समवेत माळशिरस तालुक्यातील प्रमुख मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होती.
माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी घेतलेल्या या विविध बैठका व चर्चेमुळे विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


