महिलांच्या स्वावलंबनासाठी राजकुमार हिवरकर पाटील यांचा पुढाकार; ५०% सवलतीत शिलाई मशीन वाटप

Talk18 मराठी नातेपुते (प्रतिनिधी ):
माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आणि १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. राजगड नॉलेज सिटीच्या प्रांगणात महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात शिलाई मशीन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे या उपक्रमाचे उद्घाटन लाभार्थी महिलांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची वेगळीच उंची लाभली.
या वेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख (ओबीसी) तथा राजगड नॉलेज सिटीचे चेअरमन राजकुमार हिवरकर पाटील यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभावी उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, महात्मा फुले यांनी सुमारे २०० वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाचा धाडसी पाया रचला. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि समाजातील अन्यायकारक परंपरांना आव्हान दिले.
तसेच त्यांनी अधोरेखित केले की, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरु मानत, संविधानाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानतेचा मजबूत पाया घातला. अनेक देशांत लोकशाही कोसळली, पण भारतात आजही संविधानाच्या बळावर समानतेची कास धरली आहे.
हिवरकर पाटील पुढे म्हणाले, “एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. महिलांनी स्वावलंबी व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी नारीशक्तीचा सन्मान आणि सक्षम करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत.” याच भूमिकेतून हा शिलाई मशीन उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमाची माहिती नातेपुते व परिसरातील गावांमध्ये रिक्षाद्वारे देण्यात आली असून, १ मे ते ११ मे या कालावधीत हा उपक्रम सुरू राहणार आहे. हजारो महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान लाभार्थी महिलांना शिलाई मशीन प्रमाणपत्रासह सुपूर्द करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर प्रिन्सिपल कुमारी झगडे मॅडम, अमोल शेठ यादव, किशोर शेठ लोणारे, व्हाईस चेअरमन शैलेश जोशी, संचालक रोनक चंकेश्वरा, विनायक शिंदे, डॉ. राजेंद्र जठार, नवनाथ पिसे सर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी कोळी, भाजपाचे मनोज जाधव, तेजस गोरे, सुनील बनकर, रणजीत जठार, युवा नेते बादल सोरटे, पोपटराव शिंदे, शब्बीर तांबोळी, रियाज शेख, सागर भोसले, अजय टेंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ सवलतीत मशीन देण्यापुरता मर्यादित नसून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी उचललेले एक ठोस पाऊल असल्याचे मत उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आले.


