अकलूजआर्थिकक्रीडामहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

झिंजेवस्ती येथे फुले – आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त संविधान, शिक्षण आणि स्वाभिमानाचा जागर

Talk18मराठी l आण्णा भोसले :

झिंजेवस्ती येथे महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी समाजप्रबोधनपर विचार मांडत नागरिकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात ऍडव्होकेट सुमित सावंत यांनी भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित करत नागरिकांनी संविधान वाचून त्यातील अधिकार व कर्तव्य समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. महात्मा फुले यांनी महिलांसाठी व मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून तसेच पुण्यात विविध ठिकाणी नऊ शाळा चालू करून शिक्षणाचा पाया घातला, असे त्यांनी नमूद केले. तसेच फुले वाड्यातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून सामाजिक समतेचा संदेश दिल्याचा उल्लेख केला. प्रस्थापित व्यवस्थेकडून फुलेंना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला असून, त्यांना अभिवादन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात कलम १७ द्वारे अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी कलम १४ (कायद्यापुढे सर्व समान), कलम १६ (समान संधीचा अधिकार) व कलम २१ (सन्मानाने जगण्याचा अधिकार) यांचे महत्व सांगितले. तसेच धार्मिक स्वातंत्र्य, धर्मांतर कायदे व अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल यावरही त्यांनी भाष्य केले.

डॉ. कुमार लोंढे यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” असे सांगत युवकांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले. पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक असून, आत्मविश्वास वाढवण्यासाठी मनाची तयारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

विकासदादा धाईंजे यांनी समाजातील वर्तन आणि स्वाभिमान यावर भाष्य करत प्रत्येकाने आपले वागणे निष्कलंक ठेवून महापुरुषांच्या विचारांचे पालन करावे, असे आवाहन केले. निवडणुकांमध्ये पैशासाठी मतदान करण्याच्या प्रवृत्तीवर त्यांनी टीका करत समाजाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. पुढील पिढीसमोर योग्य आदर्श ठेवण्यासाठी स्वाभिमानाचे शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने महिलांसाठी लकी ड्रॉ कुपन्स ठेवण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले.

यावेळी मान्यवर मंडळीसह महिलांची संख्याही मोठया प्रमाणात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button