जिल्हा परिषद— पंचायत समिती निवडणूक : आरपीआय आठवले कोणासोबत करणार? आघाडी अन् कोणाची करणार बिघाडी

Talk18 मराठी l वेळापूर l माळशिरस –
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेळापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीकडे केवळ जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री राजाभाऊ सरवदे साहेब, राज्य व पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔴 माळशिरस मधील दोन गटांची नाराजी संपुष्टात
या बैठकीचा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक मुद्दा म्हणजे माळशिरस तालुक्यातील आरपीआय आठवले पक्षातील दोन गटांमधील नाराजी. मागील काही काळापासून तालुक्यात पक्षांतर्गत गटबाजी व असंतोष निर्माण झाला होता. मात्र, राजाभाऊ सरवदे साहेब यांनी स्वतः पुढाकार घेत दोन्ही गटांमधील नाराजी दूर करत ऐतिहासिक सलोखा घडवून आणला.
दोन्ही गट एकत्र आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “आता पक्ष एकसंघ होऊन निवडणूक लढणार” असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
🔴 निवडणुकीसाठी थेट इशारा
यावेळी बोलताना राजाभाऊ सरवदे साहेब यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,“महायुती बरोबर पहिली चर्चा करा, अन्यथा कोणत्याही पक्षाबरोबर किंवा स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवा.”
ही निवडणूक आरपीआय आठवले पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असून,“या निवडणुकीत आरपीआयचा कार्यकर्ता निवडून आलाच पाहिजे,” हा ठाम निर्धार त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडला.
🔴 भाजपवर ताशेरे, आघाडीचे संकेत
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची भारतीय जनता पार्टीसोबत युती असली, तरी सन्मानाच्या जागा न मिळाल्यास अन्य पक्ष किंवा स्थानिक आघाडीशी युती करण्याचे स्पष्ट संकेत राजाभाऊ सरवदे यांनी दिले. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी भाजपवर उघडपणे ताशेरे ओढले.
🔴 माळशिरसच्या राजकारणात मोठा परिणाम?
आरपीआय आठवलेचे दोन्ही गट एकत्र आल्याने आगामी माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत याचा मोठा परिणाम होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे. एकसंघ पक्ष, आक्रमक भूमिका आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे माळशिरसचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राज्य पश्चिम जिल्हा आणि जिल्ह्यातून सर्व तालुकाध्यक्ष,सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



