सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रिकव्हरी व वजन काटा प्रश्नांवर साखर आयुक्तांशी थेट चर्चा

दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
पुणे (प्रतिनिधी):
सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या रिकव्हरी कमी दाखवणे, वजन काट्यांवरील अनियमितता, ऊस वजनात होणारी कपात या गंभीर बाबींवर सविस्तर चर्चा करून अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर अन्याय होऊ नये, यासाठी साखर कारखान्यांनी पारदर्शक व न्याय्य धोरण राबवावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. विशेषतः माळशिरस तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या समस्यांना सामोरे जात असून, यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
या भेटीदरम्यान पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील आणि माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी थेट साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ कारवाईची मागणी केली.
साखर आयुक्तांनी निवेदन स्वीकारत संबंधित प्रकरणांची चौकशी करून योग्य ती दखल घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, जर लवकरात लवकर ठोस निर्णय व कारवाई झाली नाही, तर शेतकरी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त करत ही लढाई रस्त्यावर उतरवण्याची वेळ प्रशासनाने येऊ देऊ नये, असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


