
२९ ऑगस्ट २०२६ l शनिवार
अकलूज Talk18 मराठी प्रतिनिधी :माळशिरस तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटने मोठी सापळा कारवाई केली. अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन व काही कलमे न लावण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) यांच्या नावाने २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पुढे ५ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन खासगी इसमांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
तक्रारदार (वय ३७, व्यवसाय लायसन्स कन्सल्टंट) यांनी २१ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांचे भाऊ व इतरांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदार अनिल शिंदे यांनी स्वतःसाठी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
मात्र तक्रारदाराने नकार दिल्यानंतर अकलूज पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ५६४/२०२६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी तसेच PC & PNDT कायद्यातील कलमे न लावण्यासाठी पुन्हा लाचेची मागणी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. २४ ऑगस्टच्या पडताळणीत आबा वळकुंदे याने २५ लाखांची मागणी केल्याचे व १० लाख स्वीकारल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने नमूद केले.
यानंतर २७ ऑगस्टच्या पडताळणीत आबा वळकुंदे व महादेव माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी आणि बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यासाठी डीवायएसपी वाळके यांच्यासाठी ५ लाख व पोलीस हवालदार राहुल वाघ यांच्यासाठी ५० हजार, अशी एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. या मागणीस पोलीस हवालदार राहुल वाघ यांनी अपप्रेरणा दिल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद आहे.
त्यानुसार पुणे युनिटने सापळा रचून आबा सावळा वळकुंदे (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) यांना पंचासमक्ष ५.५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या ब्रिजखाली, जानकर प्लॉटजवळ करण्यात आली.
या प्रकरणात आबा वळकुंदे, महादेव माने, पोलीस हवालदार अनिल महादेव शिंदे आणि पोलीस हवालदार राहुल मारुती वाघ अशा चौघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७, ७अ व १२ अन्वये माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी क्रमांक १ व २ यांना २९ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.
सापळा अधिकारी: निता मिसाळ, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.पर्यवेक्षण: सतीश वाळके, पोलीस उपअधीक्षक, पुणे.सापळा पथक: मिथुन म्हात्रे, राजेश बाटे, प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, दगडू सोनावणे, चंद्रकांत कदम.मार्गदर्शन: पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, ला.प्र.वि. पुणे.
टीप : वरील वृत्त एसीबीच्या अधिकृत माहितीनुसार आहे. संबंधित आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.


