यशवंतनगर पंचायत समिती गणात शिवराम गायकवाड यांची अपक्ष उमेदवारी; क्रांतिकारी शेतकरी संघटनेची निवडणुकीत एन्ट्री

अकलूज | प्रतिनिधी:
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांना मुहूर्त मिळाला असून माळशिरस तालुक्यात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. यापूर्वी मोहिते–पाटील विरुद्ध सर्वपक्षीय विरोधक असे समीकरण पाहायला मिळत होते. मात्र यावेळी माजी आमदार राम सातपुते प्रणित भाजप गटाविरुद्ध मोहिते–पाटील गटासोबत विविध सामाजिक संघटना व राष्ट्रीय पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा चुरशीच्या वातावरणात क्रांतिकारी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. संघटनेचे राज्यस्तरीय नेतृत्व व शेतकऱ्यांचे कैवारी, माजी राज्यमंत्री मा. रविकांत भाऊ तुपकर यांच्या आदेशानुसार, शेतकरी चळवळीत “आधुनिक भगतसिंग” म्हणून ओळख असलेले शिवराम गायकवाड यांनी ८६ – यशवंतनगर पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.शेतकरी बांधवांच्या आग्रहास्तव कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
उमेदवारी अर्ज छाननीत मंजूर झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.प्रतिनिधींशी बोलताना शिवराम गायकवाड यांनी सांगितले की, माळशिरस तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. उसदर, काटामारी, रिकव्हरी चोरी, कामगारांचे शोषण, हार्वेस्टर चालक व ऊसतोडणी प्रक्रियेत होणारी आर्थिक लूट, तसेच ओव्हरलोड वाहतुकीसाठी वाहनचालकांकडून ट्रॅक्टर व जेसीबीची विनाकारण मागणी करून होणारे शोषण — या सर्व गंभीर प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली जाणार आहे.
यशवंतनगर पंचायत समिती गणातील शेतकरी, दिव्यांग, कामगार, कलावंत, वारकरी, माता-भगिनी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी भक्कम शेतकरी चळवळ उभी करण्यात येईल. यासाठी लवकरच गावभेट दौरा सुरू केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
“शेतकऱ्यांच्या वेदना संपवण्यासाठी आम्ही आतापर्यंत लढत आलो आहोत आणि पुढेही तितक्याच ताकदीने लढत राहणार.”— शिवराम गायकवाड अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना
८६ – यशवंतनगर पंचायत समिती गण, अपक्ष उमेदवार— Talk18 मराठी


