Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

राजेंद्र राऊतांचे चार अर्ज, जीवन जानकरांचा अपक्ष अर्ज; सोलापूर विधान परिषदेत काँग्रेसचा चेहरा कोण?

Talk18 मराठी सोलापूर | प्रतिनिधी:

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तब्बल चार अर्ज नेल्याची माहिती समोर आली असून, विविध शासकीय कार्यालयांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रेही त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीची माळ राऊत यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जाला स्थानिक स्वराज्य संस्थांतील दहा सदस्यांनी सूचक म्हणून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आणखी रंगत निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, ही जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरचे माजी नगरसेवक प्रशांत फत्तेपुरकर यांना पक्षाने तयारीला लागण्याचे संकेत दिले आहेत.

यापूर्वी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सध्या पक्षाकडून त्यांच्या नावाची फारशी चर्चा होताना दिसत नाही.

दरम्यान, या निवडणुकीत एमआयएम तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडूनही हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. अपघातानंतर विश्रांती घेत असलेले मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचेही नाव चर्चेत आहे.

एकूणच, भाजपकडून राजेंद्र राऊत, अपक्ष म्हणून जीवन जानकर, तर काँग्रेसकडून संभाव्य उमेदवारांच्या चर्चेमुळे सोलापूर विधान परिषद निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी एकच उमेदवार मैदानात उतरवणार की काँग्रेस स्वतंत्र लढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button