Uncategorizedअकलूजआरोग्यआर्थिकक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसंपादकीयसामाजिक

मळोलीतील रेशन दुकानात नागरिकांची गैरसोय; सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

२० सप्टेंबर l रविवार

मळोली | प्रतिनिधी

मळोली येथे रेशन धान्य वाटपाच्या ठिकाणी नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. रेशन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची अथवा उभे राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच महिला व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेशन दुकानासमोरील परिसरात कचरा व उकिरडा असल्याने नागरिकांना त्याच परिसरात बसावे लागत असल्याची तक्रार आहे. ऊन, पाऊस अशा कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

धान्य घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सुमारे दोन फुटांच्या अरुंद मार्गातून ये-जा करावी लागत असून, परिसरात टॉयलेट व ड्रेनेज पाइप असल्याने स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुमारे १ हजार ते १ हजार ५०० चौरस फुटांचे गोडाऊन उपलब्ध असतानाही नागरिकांसाठी प्रतीक्षा करण्याची योग्य व्यवस्था का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ये-जा करण्याच्या मार्गातील पायऱ्या, पार्किंगच्या जागेत असलेले दुकान आणि इतर अडचणींमुळे रेशन दुकानाचा परिसर नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरत असल्याची तक्रार आहे.

रेशन धान्य घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सन्मानजनक व सुरक्षित वातावरणात सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

या समस्या तातडीने दूर न झाल्यास पुढील रेशन वाटपाच्या वेळी आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button