
Talk18 मराठी l सांगोला प्रतिनिधी :
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे शनिवार, दि. ३० मे रोजी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नरळे येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवंगत नितीन वाघमारे यांच्या स्मरणार्थ शोकसभेला ते प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.
दुपारी ३.३० वाजता नरळे ग्रामपंचायत पटांगण येथे होणाऱ्या या शोकसभेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी मंत्री राजाभाऊ सरवदे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
त्यानंतर आठवले हे हंगिरगे येथे बिरा लांडगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार असून, जवळा येथे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या आई स्वर्गीय शारदादेवी यांच्या स्मृतिस्थळालाही भेट देणार आहेत.
सायंकाळी सांगोला येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल सांत्वन व्यक्त करणार आहेत. त्यानंतर ते पुण्याकडे प्रस्थान करणार असल्याचे समजते.
या दौऱ्यात सांगोला तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, युवा आघाडी, मातंग आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


